काँग्रेसचे दुसरे 'शहाबानो'? हा महेश सरलष्कर यांचा सोमवार, दिनांक 22 ऑक्टोबर 2018 रोजीचा दैनिक लोकसत्तामधील लेख वाचला.
सदरचा लेख लिहिताना महेश सरलष्कर यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार केलेला दिसत नाही.
१. शबरीमला मंदिरामध्ये महिलांचा प्रवेश या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जी केस दाखल झाली होती ती केस इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन यांनी दाखल केलेली होती. या असोसिएशनच्या माध्यमातून दाखल करणारा व्यक्ती नौशाद अहमद खान हा अहिंदू व्यक्ती होता. संपूर्ण भारतामधील कुठल्याही हिंदू व्यक्तीने या बाबतीत कुठल्याही न्यायालयात कोणतीही केस दाखल केलेली नाही.
२. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना पाच न्यायाधीशांच्या पिठाच्या माध्यमातून हा निकाल दिलेला आहे. त्या पाच न्यायाधीशांच्या पिठामध्ये निकाल चार विरुद्ध एक अशा रीतीने लागलेला असून महिलांना प्रवेश नसावा याबाबतीत जो एक निकाल दिलेला आहे तो निकाल देणारी न्यायाधीश ही स्वतः महिला आहे.
३. शबरीमला मंदिर हे अय्यप्पा स्वामी यांचे मंदिर असून, तेथील मान्यतेनुसार अय्यप्पा स्वामी हे ब्रह्मचारी होते आणि त्यामुळेच मागील हजारो वर्षांपासून तेथे ही परंपरा चालत आलेली आहे.
४. शबरीमला मंदिरामधील महिलांचा प्रवेश या बाबतीमध्ये जी आंदोलने होत आहेत ही सर्व आंदोलने पक्षविरहीत असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात महिलाच ते आंदोलने करीत आहेत. शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नसावा या बाबतीमध्ये स्वतः महिलाच अत्यंत आग्रही असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीविना स्वयंप्रेरणेने हे जनआंदोलन उभा राहिले आहे.
५. मुळात तेथील रहिवाशांच्या इच्छेच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या समर्थनार्थ जो कोणी राजकीय पक्ष उभा राहील त्या पक्षाचा पराजय निश्चितच आहे, इतकेच नव्हे तर संपूर्ण देशभर होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये याचे पडसाद नक्की पडतील आणि केवळ याच कारणामुळे काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाजूने उभे राहून मंदिरामध्ये महिलांना प्रवेश असावा ही भूमिका घेत नाही.