आज अचानक प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या भेटीचा योग आला. अत्यंत प्रसन्न आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व असणारे भाऊ तोरसेकर यांच्या भेटीने आजचा दिवस एक विशेष दिवस ठरला. भाऊ तोरसेकर यांच्या बद्दल सोशल मीडियामधून माहिती होती परंतु त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा कधी योग आला नव्हता. राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा असणारा अभ्यास हा थक्क करून सोडणारा आहे असे भेटीच्या पहिल्या काही मिनिटातच लक्षात आले.
प्रल्हाद जी अभ्यांकर व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पा साठी संबित पात्रा हे अतिशय मोठं वलय असणारे नाव असल्याकारणाने संभाजीनगरवासियांनी कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मध्यप्रदेश मधील भोपाळ या ठिकाणी काही अतिशय महत्वाच्या कारणामुळे संबित पात्रा यांना कार्यक्रमासाठी येणे शक्य झाले नाही. अशा अत्यंत बिकट प्रसंगी इतक्या मोठ्या नावाच्या बदल्यात दुसरे नाव शोधणे हे देखील तसे आयोजकांसाठी अत्यंत आव्हानात्मक काम होते. काही नावांची चर्चा झाल्यानंतर भाऊ तोरसेकर यांचे नाव सर्वांसमोर आले, अर्थातच सर्वांनी या नावाला दुजोरा दिला आणि मग भाऊंशी संपर्क करण्यात आला. ज्ञानाच्या दृष्टीकोनातून अत्यंत प्रकांड पंडित असणारे भाऊ अतिशय साधे आहेत. आयोजकांच्या विनंतीला मान देऊन अतिशय कमी कालावधीमध्ये राफेल सारख्या अत्यंत गहन विषयावर बोलण्यासाठी आणि त्यातही संबित पात्रा यांच्या बदल्यात बोलण्यासाठी भाऊंनी संमती कळवली आणि लगेचच त्यांना मुंबईवरून संभाजीनगरला बोलवण्यात आले.
विमानतळावरून भाऊंना राज्य माहिती आयुक्त श्री धारूरकर यांच्या घरी चहापानासाठी निमंत्रित करण्यात आले होते आणि तेथेच आम्हा सर्वांची त्यांच्याबरोबर भेटी ठरली होती. अतिशय अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून भाऊ तोरसेकर यांचे व्यक्तिमत्त्व आम्हा सर्वांसमोर उलगडू लागले. एक पत्रकार असणारे भाऊ एखाद्या गोष्टीचा किती वेगवेगळ्या पद्धतीने आणि सर्वसामान्यपणे आपल्याला लक्षातही येणार नाही इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतात हे लक्षात आले. प्रसंग कितीही साधा असला तरी देखील त्यामध्ये काहीतरी शिकण्यासारखे असते आणि असे शिकणे आपल्याला दिवसेंदिवस समृद्ध करत जाते याची जाणीव भाऊंना भेटल्यानंतर झाली. अत्यंत गंभीर विषयांमध्ये देखील विनोदी शैलीचा वापर करून तो विषय सर्वसामान्यांना कशा पद्धतीने समजावून सांगता येईल याची भाऊंची शैली वाखणण्याजोगी आहे. संपूर्ण भारतच नव्हे तर एकंदर जगातील सर्वच देशांच्या राजकारणातील घडामोडी आणि त्या संदर्भातला अत्यंत सूक्ष्म अभ्यास हा भाऊंच्या आवडीचा विषय. एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा करताना किती खोलपर्यंत विचार करणे आवश्यक आहे नव्हे तो करणे अगत्याचे आहे हे आज भाऊंना भेटल्यावर समजले. कुठल्याही पक्षाची किंवा एखाद्या संघटनेची बांधिलकी न घेता अत्यंत त्रयस्थ दृष्टीने त्याकडे पाहून राजकीय विश्लेषण करणे हे कोणी भाऊंकडूनच शिकावे.
तापडिया रंगमंदिरामध्ये असणाऱ्या स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पाच्या निमित्ताने आणि संबित पात्रा अशा वलयांकित व्यक्तीच्या भाषणासाठी संभाजी नगरवासीयांनी अलोट गर्दी केलेली होती. तापडिया रंगमंदिरामध्ये लोकांना बसण्यासाठीचा विषय तर सोडूनच द्या, परंतु उभे राहण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती. एका दृष्टीने लोकांच्या अपेक्षा या संबित पात्रा यांना ऐकण्यासाठी आसुसलेल्या असताना भाऊ तोरसेकर यांनी अत्यंत उत्कृष्ट रीतीने आणि त्यांच्या अमोघ वाणीने तसेच प्रचंड ज्ञानाच्या बळावर सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आणि संबित पात्रा यांच्यापेक्षा भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान झाले ते जास्त चांगले झाले अशी सर्व श्रोत्यांमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर चर्चा रंगली होती यातच सर्व आले...
फारच छान
ReplyDeleteया व्यक्तीचा अभ्यास अतिशय गहन आहे हे आज अनुभवले
आणि एखाद्या विषयाची मांडणी सोप्या पद्धतीने कशी करावी आणि व्याख्यान किंवा भाषण कसे असावे हे कळले
आजचं व्याख्यान माझ्या आयुष्यातील खूप छान आणि आवडलेलं होतं
आणि तुम्हाला त्यांच्या भेटीचा योग आला हे वाचून आनंद झाला.
धन्यवाद
Deleteअप्रतिम,एका खऱ्या ख़ुरया मोठ्या माणसाचा सहवास आज लाभला.आज पर्यन्त वाचत होतो...आज प्रत्यक्ष भेट -एकण्याची सन्धी मिळाली.धन्यवाद भाऊ!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteशब्दांकन छान केले आहे.
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteएअदम छक्कास
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete